किर्लोस्कर नाटकगृहात झालेल्या काव्यगायनाच्या त्या (मे,१९२७) कार्यक्रमात त्या काळच्या मोठमोठया कवींनी भाग घेतला. 'रविकिरण मंडळ’च्या सभासदांनी आपापल्या कविता गाऊन दाखविल्या. त्या वेळी ‘काव्यवाचन’ होत नसे, ‘काव्यगायन' होत असे. यशवंत कवी गायले. गिरीश गायले. माधव जूलियन गायले. त्यांच्यानंतर एक व्यक्ती काव्य-गायन करण्यासाठी व्यासपीठावर येऊन उभी राहिली. उंच, किरकोळ शरीराचा, शेलाट्या अंगाचा हा पोरसवदा माणूस श्रोत्यांच्या परिचयाचा नव्हता. परंतु प्रत्यक्षात घडलं ते अगदीच वेगळं ! त्या कवीची पहिली कविता ऐकल्याबरोबर लोकांनी हशाटाळ्यांनी सबंध नाटकगृह डोक्यावर घेतलं! श्रोत्यांना नमस्कार ठोकून तो कवी आपल्या जागेवर जाऊन बसला तरी हशाटाळ्यांचा गजर चालूच होता. काव्य- गायनाची त्या दिवशीची सभा त्यानं जिंकली होती, गाजविली होती! त्या कवीचं नाव होतं ‘केशवकुमार’! त्याच्या काव्यसंग्रहाचं नाव होतं ‘झेंडूची फुले’! विडंबनकाव्य हा काव्याचा एक नवीनच प्रकार त्यानं लोकांना सादर केला होता, आणि लोकांची दिलखुलासा वाहवा मिळविली होती. त्या माणसाचं नाव होतं, ‘प्रल्हाद केशव अत्रे!
-ना. सी. फडके
अत्रे म्हणजे मूर्तिमंत चैतन्य! ज्याच्या बोलण्यातून, लिहिण्यातून, दैनंदिन कार्यक्रमांतून, भव्य संकल्पातून आणि रम्य स्वप्नातून जीवनाचा खळखळणारा प्रवाह दुथडी भरून वाहत असतो, असा हा जबरदस्त माणूस! साहित्याच्या आकाशात अनेक नक्षत्रे नेहमीच चमकत असतात. पण भोवतालच्या काळाला क:पदार्थ लेखून चमचमत राहणारी, आपल्या प्रकाशाने भयभीत वाटसरूंना दिलासा देणारी आणि तो देत असताना आपल्या नर्तनाने त्यांना प्रसन्न करणारी विजेसारखी प्रतिभा या आकाशात फार क्वचित् दृष्टीला पडते. महाराष्ट्रातील जनमानसाने पूजा केली ती अत्र्यांसारख्या साहित्यिकातल्या या चमचमणाऱ्या आणि कडकडणाऱ्या विजेची! अत्र्यांची स्मृती मराठी साहित्याला आणि मराठी जीवनाला सदैव प्रेरणा देत राहो हीच इच्छा.
-वि. स. खांडेकर
अत्रे तोंडानेही बोलतात आणि लेखणीनेही बोलतात. गर्दीवर झेप घ्यायला विनोद आणि वक्तृत्व हे दोन पंख लागतात अत्र्यांच्या विनोदाला अस्सल मराठी ढंग त्यांच्या मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे मिळाला. जीवनाचे नवे दर्शन घडायला दृष्टी शुद्ध हवी. ती चांगल्या विनोदाच्या अंजनाने शुद्ध राहील. लाख लोकांच्या हसण्यातून जो प्रचंड निनाद उठतो, लाख टाळ्यांच्या कडकडाटातून जे वादळ निर्माण होते, त्याची बेहोषी काही अलौकिक असते. आणि महान कार्य बेहोषीशिवाय होऊ शकत नाही. अत्र्यांनी विनोदातून ही बेहोषी महाराष्ट्राला दिली. राष्ट्रावर आणि महाराष्ट्रावर आलेल्या प्रत्येक आणीबाणीच्या प्रसंगी अत्र्यांनी आपली लेखणी बेफाम घोडयाच्या गतीने फेकली आहे. कोणताही मराठी माणूस अत्र्यांचे उपकार विसरण्याइतका कृतघ्न होणार नाही. नाथांनी भारुडे लिहून हसवित हसवित वेदांत शिकवला हसत हसत गंभीर विचार पोचवायची ही नाथांच्या घरची उलटी खूण अत्र्यांनी ओळखली आणि महाराष्ट्राला ती पटली हे अत्र्यांचे भाग्य नि महाराष्ट्राचेही भाग्य समजले पाहिजे.
- पु. ल. देशपांडे
माझ्या डोळ्यापुढे अत्रे हे एकच उदाहरण होते. दाक्षिणात्य देवळांच्या गोपुरासारखे त्या माणसाचे कर्तुत्व उंचावत गेले होते. असंख्य चित्रांनी सुशोभित होत गेले होते. दांडगा माणूस. दांडगे कर्तुत्व. लिहिणे आणि बोलणे हा अत्रे या माणसाचा स्वभाव. वाहणे आणि खळखळणे हा प्रवाहाचा धर्म. अत्रे पुन्हा होणार नाहीत. पण साहित्याचे अक्षरत्व मानणार्या मनाने गंभीरपणे एकाच प्रश्न विचारला अत्र्यांवर अत्र्यांसारखा मृत्युलेख लिहील कोण?
- ग. दि. माडगूळकर
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे या व्यक्तीच्या चरित्राला नि चारित्र्याला न भूतो न भविष्यती उजाळ्याचे भाग्य लाभले, ते संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात. जीवनिष्ठेची तहान भागीविणार्या ज्या मधुबिंदुसाठी हा मधुकर एखाद्या पिसाटासारखा या फुलावरून त्या फुलावर गुंजारव करीत वणवणत होता, त्याला मऱ्हाठी मायदेशाच्या प्राणांतिक किंकाळीत स्वतःच्या जीवनसिद्धीचे यथार्थ दर्शन झाले. आजवर पूजलेली भजलेली सारी दैवते भराभर दूर झुगारून, ते महाराष्ट्र-परमेशाच्या अनन्य सामान्य भक्तीरसात आपदमस्तक न्हाऊन पतिताचे पावन झाले. दगडी किंवा धातूच्या पुतळ्यापेक्षा अथवा तसल्याच एखाद्या नाशिवंत स्मारकापेक्षा, या अंदोलनातल्या कामगिरीने अत्रे यांचे नाव अक्षरशः अजरामर केले आहे, यात शंका नाही.
- प्रबोधनकार ठाकरे
आचार्य अत्रे महाराष्ट्राच्या डोळ्यांसमोर सतत वावरत राहिले. नाटककार म्हणून त्यांनी किर्ती संपादन केली.चित्रपटाचे क्षेत्र त्यांनी गाजविले. वृत्तपत्रकार,प्रभावी वक्ता, विनोदी लेखक, झंझावाती प्रचारक, कळकळीचा कार्यकर्ता अशा अनेक नात्यांनी त्यांचे नाव सतत गाजत राहिले. आचार्य अत्रे ही व्यक्ती नाही तर ती एक शक्ती आहे.ज्ञानदेवांच्या आणि शिवरायांच्या, लोकमान्य टिळकांच्या आणि पूज्य सावरकरांच्या या महाराष्ट्रात सतत उत्साहाने, उमेदीने, चैतन्याने भारलेले असे वातावरण निर्माण करते आहे. मराठी मनाचे मूर्तिमंत प्रतीक असेच त्यांचे वर्णन करता येईल.
- लता मंगेशकर
साहेबांची किर्ती जगजाहीर आहे. ते कोण आहेत आणि काय आहेत हे सांगण्याची सोय उरली नाही. महाराष्ट्रात साहेबांनी संचार केला नाही असे ठिकाण नाही, आणि व्याख्यान झोडले नाही असा गाव नाही. असंख्य जनसंपर्कामुळे, साहेब आणि जनता ह्यांच्यात विलक्षण दिलजमाई झालेली दिसून येते. जनतेवर साहेबांची अमर्याद भक्ती. भक्तीचे सामर्थ्य मोठे दांडगे आहे. नामदेव किर्तन करत असताना, जनताजनार्दन डोलतो आणि सहस्त्र हातांनी टाळ्या वाजवितो. जनतेचा आवाज हाच साहेबांचा आवाज.साहेबांची वाणी कधी अमृतवाणी, तर कधी शापवाणी असते. पण अखेर ती असते लोकवाणीच ! साहेबांचा मित्रपरिवार अफाट असला तरी त्यांचे खरे जिवलग असे सोबती दोनच. एक समुद्र आणि दुसरा डोंगर. मुंबईच्या समुद्रकाठावर त्यांचे निवासस्थान आहे आणि खंडाळ्याच्या डोंगरमाथ्यावर त्याचे विश्रांतीस्थान आहे. विचारमंथनासाठी ते समुद्राकडे धाव घेतात तर आत्मचिंतनासाठी पर्वताचा आश्रय घेतात. साहेबांच्या व्यासंगाला सागराची खोली आणि प्रतिभेला पर्वताची उंची प्राप्त झाली आहे त्याचे कारण हेच.
-दत्तू बांदेकर
आचार्य अत्र्यांनी महाराष्ट्राच्या साहित्यसृष्टीत आणि सामाजिक जीवनात जे केले ते खरोखर ‘चमत्कारातच’ गणले जाईल. कथा, बोलपट, नाटक, वक्तृत्व, वृत्तपत्र, समाजकारण आणि राजकारण या विविध क्षेत्रांतून त्यांनी एखाद्या झंझावाताप्रमाणे संचार केला. यश आणि किर्ति ही त्यांच्या पायखुणा शोधीत, खरेदी केलेल्या गुलामाप्रमाणे पाठोपाठ धावत राहिली. अत्र्यांच्या प्रतिभेचे सामर्थ्य असे की, ज्या क्षेत्रात ती गेली त्यात तिने राणीच्या दिमाखानेच संचार केला. एका बाजूस हे प्रखर तेज आहे, दुसऱ्या बाजूला स्वतः आसवे गाळणारी व इतरांना गाळायला लावणारी आर्द्रता आहे; एका बाजूला अनिर्बंध प्रज्ञावाद आहे, दुसऱ्या बाजूस समर्पणाचा मंत्रघोष आहे, दुसरीकडे अवखळ हास्याचा गडगाडाट आहे; विद्वत्ता आहे आणि रसिकताही आहे; रग आहे आणि रंगही आहे; संहार आहे आणि सहाय्यताही आहे ! अशा विविध आणि विरोधी शक्ती ज्याच्या ठिकाणी एकत्रित झाल्या आहेत अशी आचार्य अत्र्यांसारखी व्यक्ती एका शतकात एखादे वेळीच जन्माला येते.
-वि. वा. शिरवाडकर