शक्तीचे आणि भक्तीचे पावनतीर्थ होते माझे गाव सासवड. उदात्त आणि ओजस्वी जीवनाचा रोज तिथे साक्षात्कार घडे. ह्रुदयात अन् मस्तकात नाना तर्हेचे संचार होत. उशाला अष्टौप्रहर शिवाजीमहाराजांच्या पुरंदर किल्ल्याचा पहारा असे अन् शेजारी श्रीसोपानदेवांची भक्तीवीणा सदैव वाजत राही. ज्ञानोबांची पालखी दर वर्षी गावातूनच पंढरीला जाई. त्या वेळी दिंड्यापताकांची अशी काही गर्दी उडे की, टाळमृदंगाच्या नि ग्यानबा-तुकारामाच्या गजराने गाव दुमदुमून जाई अन् चंद्रभागेचे स्नान अंगणातच घडल्यासारखे वाटे. खरोखर, संतांनी आणि वीरांनी कृतार्थ केलेल्या महाराष्ट्रात जन्माला येण्यासारखे भाग्य नाही दुसरे.
त्या काळचे पुणे उदासवाणे होते. कंटाळवाणे होते. त्याच्या जीवनात वैचित्र्य फार कमी होते.ओघ तर मुळीच नव्हता. परंपरेची धूळ चहुंकडे साचून राहिलेली होती. एखाद्या जुनाट वृध्द ब्राम्हणाप्रमाणे ते डोक्याला गतवैभवाची विटकी कानटोपी घालून आणि अंगावर स्मृतींची धाबळी पांघरून मुळामुठेच्या काठी अर्धवट पेंगत बसलेले होते. असे असूनही त्या शहराचे ह्रुदय झोपलेले नव्हते. ते जागृत झाले होते. त्याच्या धमन्यातून नवीन महत्वाकांक्षेचे रक्त उसळ्या घेत होते. त्याच्या नाडीतून नवे चैतन्य सळसळू लागले होते. उघड्या डोळ्यांनी आणि उत्सुक मनाने पुणे शहरात त्या वेळी जे जे कोणी रहात होते आणि वावरत होते, त्यांनाच पुण्याच्या अंतरंगात धगधगत असलेल्या त्या विलक्षण तेजाची जाणीव होणे शक्य होते. त्या वेळी पुण्यमध्ये स्फूर्तीचे अनेक लहानमोठे उच्छ्वास होते. ते नुसते डोळ्यांनी बघणे आणि त्यांच्या अंतःकरणातल्या खळखळाटाचा कानोसा घेणे हेच पुणे शहरातल्या त्या वेळच्या लोकांचे भाग्य होते.लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, शिवराम महादेव परांजपे, महर्षी अण्णासाहेब पटवर्धन ह्यांच्यासारख्या महापुरुषांचे साधे दर्शन जरी झाले तरी सार्या व्यथा आणि व्याधी दूर पळून जात. पुण्यातल्या शाळा आणि कॅालेजपेक्षा तरूण पिढीला शिक्षण आणि स्फूर्ती मिळण्याची ही खरी त्या वेळची जागृत ठिकाणे होती. दर वर्षी गणपतीच्या उत्सवात आणि वसंत ऋतूत भारतवर्षातले सारे ज्ञान आणि विद्वत्ता आपल्या पायांनी चालत पुण्याला येई. कोणत्याही शाळांमध्ये, कॅालेजांमध्ये कधीही न मिळणारे बहुमोल असे ज्ञान पुण्यात नुसते राहिल्याने माणसाला मिळत असे आणि तेच खरे पुण्याचे माहात्म्य, पुण्याचे सामर्थ्य, आणि पुण्याचे वैशिष्ट्य. अशा पुण्याने आपल्या मांडीवर बसवून त्या वेळी मला प्रेमाने जोजवले, कुरवाळले, वाढवले आणि घडवले. म्हणून आयुष्यात काही तरी चारदोन वेड्यवाकड्या गोष्टी मला बोलता आल्या, लिहिता आल्या आणि करता आल्या.