मी जीवनाचा यात्रेकरू आहे. माझ्या खांद्यावरची पताका अजून खाली होत नाही. माझ्या पायाचे चक्र अद्याप सुटत नाही. कोणत्याही एका ‘क्षेत्रा’त मी फार काळ राहिलो नाही, हयाबद्दल मला खेद होत नाही. मी ज्या ज्या गोष्टी केल्या, त्या सर्वांचे अजूनही मला आकर्षण आहे. त्यामध्ये मिळविलेले प्रावीण्य मी काही गमावलेले नाही. चित्रपटाच्या व्यवसायात मी शिरलो, म्हणून शिक्षणशास्त्र थोडेच विसरलो ? किंवा माझी नाट्यप्रतिभा थोडीच आटली ? शिक्षक होण्यापूर्वी मी कवि होतो. फुलांवर प्रेम करणार्याला मुलांवर प्रेम करणे सोपे जाते. शिक्षक असतांना मी नाटके लिहू लागलो. मुलांचे मन जो जाणतो, तो यशस्वी शिक्षक होतो. प्रेक्षकांचे मन जो ओळखतो, तो प्रभावी नाटककार होतो. मी उत्तम शिक्षक होतो म्हणून चांगला नाटककार झालो. नाटके लिहिता लिहिता मला जीवनातले नाटक समजू लागले म्हणून मुलांचे लहान जग सोडून मी माणसांच्या मोठ्या जगात शिरलो. परिणामकारक ‘नाटक’ कसे निर्माण करावयाचे हे मला माहीत होते. म्हणूनच मी लोकप्रिय वक्ता आणि यशस्वी पत्रकार होऊ शकलो. माझ्या एका व्यवसायातून दुसरा व्यवसाय उमलला म्हणून पाहिल्याचे सामर्थ्य दुसर्यात आले. पण व्यवसाय हे काही माझे जीवन नाही. जीवन हाच माझा व्यवसाय आहे.